मुंबई : केतकर हे आता वयोवृद्ध गृहस्थ आहेत... आणि वाढत्या वयाची लक्षणं केतकरांच्या वक्तव्यातून दिसून येतायत... ते काल्पनिक जगात वावरत असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिलीय. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसणं हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा सनसनाटी आरोप पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतना काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केला होता. याच मुद्द्यावर माधव भांडारी बोलत होते. केतकर यांच्या या वक्तव्यात कुठल्याही प्रकारची सत्यता नाही आणि त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय स्तरावर कुठेही काहीही परिणाम होणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. काल्पनिक जगात राहणं, काल्पनिक जगात वावरणं आणि तेच जग खरं आहे असं मानणं हेच केतकरांच्या बाबतीत घडतंय. ज्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलाय त्या घटनांचा मी स्वत: साक्षीदार आहे.... त्यामुळे केतकरांच्या वक्तव्यात कोणताही खरेपणा नसल्याचं माधव भांडारी यांनी म्हटलंय.
काँग्रेस खासदार कुमार केतकरांच्या विश्वासार्हतेवर महाराष्ट्रात अगोदरपासूनच प्रश्नचिन्ह आहेत, पण महाराष्ट्राबाहेर त्यांच्या वक्तव्यांना कोणतंही महत्त्व नाही. फक्त बिनबुडाचे आरोप करायचे आणि त्याबद्दल एकही पुरावा द्यायचा नाही हे राहुल गांधींचं तंत्र केतकरही वापरताना दिसतायत, असं म्हणत माधव भंडारी यांनी कुमार केतकर यांचे आरोप फेटाळून लावलेत.
अधिक वाचा :- 'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग'
२०१९ मधील निवडणुकीत मोदींचा पराभव झाला तरीसुद्धा सत्ता हस्तांतरण सामान्यपद्धतीनं होणार नाही, असंही केतकरांचं म्हणणं आहे. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना केतकरांनी ही विधानं केली आहेत. येत्या निवडणुकीत मोदींचा पराभव झालाच तर मात्र त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारनाम्यांचे पुरावे बाहेर येतील, अशी भीती असल्यानं सध्या सीबीआयसह सगळ्या संस्था मोदी आणि शाहांनी ताब्यात घेण्याचा सपाटा लावल्याचंही केतकरांनी म्हटलं होतं. या अधिवेशनात मोदींची निवड पंतप्रधान पदासाठी झाली नसती तर तिथेच मोठ्या प्रमाणात दंगल झाली असती... आम्ही धड काहीच चालू देणार नाही, अशा धमक्या आम्हाला पक्षातूनच आल्या होत्या. अप्रत्यक्षरित्या आपण त्या दबावाला बळी पडून नरेंद्र मोदींचं नाव आपण पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं...' असं राजनाथ सिंग यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोटही कुमार केतकर यांनी केलाय.