मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर थाटामाटात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकासआघाडीच्या सहा मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सर्वात आधी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. देसाईंनंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भुजबळांनंतर शपथ घेतली. तर सर्वात शेवटी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी शपथ घेतली.
यावेळी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या नावापुढे आईच्या नावाचाही उच्चार केला... 'मी जयंत कुसुम राजाराम पाटील...' असं म्हणत त्यांनी शपथेची सुरुवात केली. त्यांचा हा अंदाज अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.
VIDEO : 'मी जयंत कुसुम राजाराम पाटील...'@NCPspeaks #Jayantpatil@ShivSena #UddhavThackeray #UddhavCM @Jayant_R_Patil pic.twitter.com/xocDhTjrs9
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 28, 2019
यासाठी अभिनेता रितेश देशमुख यांनीदेखील ट्विट करुन जयंत पाटील यांचं अभिनंदन केलंय. जयंत पाटील यांनीही रितेश देशमुखांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना 'धन्यवाद' म्हटलंय.
Congratulations @Jayant_R_Patil ji - it was heart touching to hear your mother’s name along with your fathers name during your swearing in ceremony. #Respect
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 28, 2019
यावेळी, त्यांना आपल्या दिवंगत आईची प्रचंड उणीव भासल्याची प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय. 'यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.#MaharashtraVikasAghadi pic.twitter.com/TZvFc9Xz4f
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 28, 2019
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. भगव्या रंगाचा सदरा घातलेल्या उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून ईश्वरसाक्ष शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी व्यासपीठावरूनच महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घातला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय यावेळी आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, कमलनाथ, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आदी नेतेही या शपथविधी सोहळ्याला हजर होते. त्यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात.