मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे लसीचा अभाव, यामुळे महाराष्ट्रात कोरोनाला रोखणे फार कठीण झाले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती खूप खराब झाली आहे. लोकं कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी या कडक उन्हात लसीकरण केंद्राकडे येतात, तासन तास रांगेत उभे रहातात, गर्दीत प्रवास करुन नागरिक कोरोना संसर्गाची जोखीम घेतात परंतु त्यांना नंतर कळते की, आज केंद्रात लसच उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच लसीकरण केंद्रांची सध्या हीच स्थिती आहे.
मुंबईतील वांद्रा कुर्ला संकुलमध्ये (बीकेसी) सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. या लसीकरण केंद्रात सध्या केवळ 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. कारण या केंद्रात केवळ एक हजार डोसच उपलब्ध आहेत. 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोकं, म्हणजेच ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, असे लोकं देखील आज लसीकरण केंद्रावर पोहोचले.
ते याआधी ही लस घेण्यासाठी केंद्रावर आले होते, परंतु लस संपल्यामुळे त्यांना आजची तारीख दिली गेली होती. परंतु आज केंद्रावर आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आज डोस मिळणार नाहीत.
एकीकडे सरकार लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करत आहे. तर दुसरीकडे या वाईट व्यवस्थेमुळे लोकांना पुन्हा पुन्हा लसीकरण केंद्रावर यावे लागत आहे. काही सरकारी कर्मचारीही यामुळे चिडले, त्यांना आणखी एक डोस घ्यायचा आहे, परंतु त्यांना व्यवस्थापकांकडून योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे ते लसीकरण केंद्रावर पोहोचले. परंतु त्यांना हताश होऊन जाण्यापलिकडे पर्याय नव्हता.
लस उपलब्ध नसल्याने देशासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु यंत्रणेतील त्रुटी देखील लोकांच्या समस्यांमागील एक मोठे कारण आहे. जर लोकांना एसएमएसद्वारे योग्य वेळी माहिती दिली गेली की, 'आज लसी अभावी तुम्हाला लस देता येणार नाही.' तर जे लोकं या कडक उन्हात लसीकरण केंद्रात येत आहेत, ते आपले घर सोडणार नाहीत आणि त्यामुळे या लोकांना कोरोना संसर्गाची भीती देखील कमी राहिल.