नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना दुर्दैवी आणि क्लेशदायक : अजित पवार

नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार

Updated: Apr 23, 2021, 09:14 AM IST
नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना दुर्दैवी आणि क्लेशदायक : अजित पवार title=

मुंबई : राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक आणि विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत.

यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल.

मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.