मुंबई : सिडकोचं घर लागलेल्या अनेक सामान्य नागरिकांनी अचानक घरं रद्द करून फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. मार्च २०१८ ला सिडकोच्या १५ हजार घरांची जाहिरात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर २०१८ ला घरं घोषित करण्यात आली आणि ९ सप्टेंबर २०१९ ला वितरण पत्रही वाटण्यात आली. त्यानुसार अखेरचा हप्ता ५ जून २०२० पर्यंत भरण्यात यावा अन्यथा घरं रद्द होईल असं लिहिलं आहे. मात्र आपल्याला काही दिवसांपूर्वी अचानक १३ दिवस शिल्लक असल्याचा सिडकोचा संदेश आला आणि त्यांनंतर अचानक तीन-तीन दिवस कमी होत गेले.
१० फेब्रुवारी २०२० ला घर रद्द झाल्याचा संदेश आल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे साडेचार हजार लोकांची घरं रद्द करण्यात आली असून सिडको अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न वर्गातील तळोजा, घणसोली, खारघर, कळंबोली इथली ही घरं आहेत.
दरम्यान यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याची प्रतिक्रिया सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी झी २४ तासला दिली आहे.