मुंबई : यंदा उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाण्याचा विचार करत असाल किंवा तसा आराखडा आधीच तयार झाला असेल. तर त्याची पुरती वाट लागणार आहे. कारण उन्ह्याळीची सुटी 1 मे पासून देण्यात यावी असे निर्देश शिक्षण विभागानं काढले आहेत. त्यामुळे यंदा वार्षिक परीक्षा संपल्यावरही मुलांच्या शाळांना सुटी लागणार नाही आहे.
वार्षिक परीक्षा संपल्यावर निकाल लागेपर्यंत शाळा सुरू होतील. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणानं हे परिपत्रक काढलंय. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत शाळेत जावंच लागणार आहे. या काळात शाळांना मुलांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम राबवावेत अशी प्राधिकरणाची अपेक्षा आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळांना यावर्षी 1 मे नंतर सुट्टी देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने काढला आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळाच्या सुट्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची परीक्षा झाल्यावर न मिळता राज्यातील सर्व शाळांना आता ह्या सुट्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मिळणार असून जून पर्यँत शाळा सुरु होईपर्यंत पुढील जवळपास 1 महिना या सुट्या असणार आहेत. असा शासन निर्णय महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे 1 ते 9 वीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा मार्चमध्ये झाल्या असतील किंवा एप्रिल महिन्यात होणार असतील अशा विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपर्यँत शाळेत येणे बंधनकारक असणार आहे.
याशिवाय, या काळात शाळांनी विविध उन्हाळी शिबीर, वेगवेगळी उपक्रम शाळांनी राबवावी असे आदेश यामध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी सुट्टीची प्लॅनिंग केली असेल त्यांना या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे. शिवाय राज्यात तापमानाचा तडाखा वाढत असताना एप्रिल पर्यँत शाळा सुरु ठेवण्याच्या निर्णयाला अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.