मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या सुंदर फोटोने उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांची मने जिंकली आहेत. वास्तविक चित्र मुंबईतील रेल्वे स्थानकाचे आहे. जेथे लोकल पकडण्यासाठी पोहोचलेला एक प्रवासी रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी खाली वाकून त्याला नमन करतोय. हा क्षण कुणीतरी कॅमेर्यावर कैद केला. त्यानंतर हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सामान्य लोकांसाठी मुंबई लोकल बंद ठेवली होती. परंतु 1 फेब्रुवारी रोजी 11 महिन्यांनंतर लोकल गाड्या पुन्हा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आल्या.
The soul of India... I pray we never lose it... https://t.co/Xw48usPnew
— anand mahindra (@anandmahindra) February 3, 2021
हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आनंद महिंद्रा यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- सोल ऑफ इंडिया, मी प्रार्थना करतो की आपण कधीही हे गमावू नये. बातमी लिहिण्यापर्यंत या ट्विटला आठ हजाराहून अधिक लाईक्स आणि 600 हून अधिक रि-ट्वीट प्राप्त झाले आहेत.
तब्बल 11 महिन्यांच्या अंतरानंतर रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली. पण यासाठी काही तासांचा मर्यादित कालावधी आहे. यावेळी व्यवस्थापनासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुल्या करणार असल्याचे सांगितले होते. कोरोना काळात लॉकडाउन झाल्यापासून केवळ आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठीच रेल्वेने प्रवासाची परवानगी होती.