राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा महत्वाचा निर्णय

मंत्री, आमदारांना दिल्या ह्या सक्त सूचना

Updated: Jan 5, 2022, 02:48 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा महत्वाचा निर्णय title=

मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील ३१ जिल्हे कोरोना आणि ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडले आहेत. रुग्ण संख्या वाढीचा दार जास्त असला तरी त्या तुलनेत मृत्यू दर कमी आहे. हि राज्यासाठी नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे जिल्ह्याचा आढावा घेत नागरिकांसाठी काही निर्बंध जाहीर केले. ज्या नागरिकांनी मास्क घातला नसेल अशाना ५०० रुपये तर मास्क न घालता रस्त्यावर थुकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

तर आज सकाळी अजित पवार यांनी टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यानुसार राज्यात निर्बंध लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

राज्य सरकारमधील १५ मंत्री आणि किमान ७० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या लोकप्रतिनिधींचा जनतेशी सतत संपर्क होत असल्याने कोरोनाचा अधिक फैलाव होतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, आमदारांना पक्षाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे सर्व नेते आणि मंत्री उपस्थित होते. या बैठकीतच सर्वाना सूचनावजा ताकीद देण्यात आली आहे.
   
पक्षाचे या महिन्यात होणारे नियोजित शिबीर आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नये. थोडे दिवस थांबावे, असे आवाहन केले होते. तशा सूचना त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीतही केल्या होत्या. कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता हि पावले टाकणे गरजेचे आहे. त्यानुसार पक्षाने हि भूमिका घेतल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.