मुंबईतल्या शाळांचे धक्कादायक वास्तव, प्रवेश घेण्याआधी हे नक्की वाचा

 मान्यता न घेताच संस्थाचालकांच्या झोपडपट्टीत शाळा

Updated: Jan 6, 2021, 10:07 AM IST

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. ही मान्यता न घेताच अनेक संस्थाचालकांनी झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या आहेत. जवळपास मुंबई शहरात २०६ बेकायदा शाळा असल्याचं मुंबई महापालिकेच्या यादीत उघड झालंय. 

सरकारी नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येतेय. अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळील महापालिकेच्या किंवा मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने नुकतीच बेकायदा शाळांची यादी जाहीर केली. मानखुर्द, गोवंडी,  मालाड, मालवणी, घाटकोपर, भांडुप परिसरातील शाळांना नोटीस देण्यात आलीय. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ शाळा बेकायदा आहेत. यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची सूचना मुंबई पालिकेने शाळा प्रशासनाला केलीय. शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रे तपासा असे आवाहन देखील करण्यात आलंय.