मुंबई : पीक विम्याला यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केलेय. विम्यातील गोंधळ दूर करण्यासाठी ऑनलाईन केवायसी असेल असे ते म्हणालेत.
पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. येत्या पाच ऑगस्टपर्यंत पीकविम्याचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलीय. ३१ जुलैपर्यंत पीकविमाचा अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्यानंमुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारनं ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांनी पाच पाच वेळा विम्याची रक्कम घेतली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. हे टाळण्यासाठी ऑनलाईन केवायसी करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय पुढच्यावर्षी दोन ते तीन महिने आधीच केवायसी सुरु करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.