एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; देवेंद्र फडणवीस यांचे पत्र

'अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा', अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

Updated: Aug 30, 2021, 04:30 PM IST
एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; देवेंद्र फडणवीस यांचे पत्र title=

मुंबई : 'अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा', अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'एस. टी. महामंडळातील कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टच लिहून ठेवले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणार्‍या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे'.

माझी आपल्याला विनंती आहे की, एसटी कर्मचार्‍यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे आणि वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा आणि राज्यभरातील या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा. केवळ कर्मचारीच नाहीत, तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.