स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण करणारी विशेष फॉगिंग मशिन्स सरकारला प्रदान

स्वाध्याय परिवाराकडून सरकारला विशेष निर्जंतुकीकरण मशिन्स

शैलेश मुसळे | Updated: Apr 12, 2020, 12:04 AM IST
स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण करणारी विशेष फॉगिंग मशिन्स सरकारला प्रदान title=

मुंबई : सध्या कोरोना भारतात पाय पसरवत आहे. पण संपूर्ण भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे. जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा अनेक संस्था आणि संप्रदाय मदतीसाठी पुढे आले आहेत. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) आणि त्यांची सुपुत्री सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी नेहमीच समाजाची चिंता आणि काळजी केली आहे. नागरिकांनी घराबाहेर डू नये आणि सोशल डिस्टंसिंग पाळावे ज्यामुळे कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. 

महामारीच्या वेळी अशा उपायांबरोबरच अनेक देशांमध्ये फॉगिंग मशिन्स द्वारे विशेष जंतुनाशकांची फवारणी करून अनेक हमरस्ते तसेच अनेक वस्त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वाध्याय परिवारातर्फे अशा प्रकारची विशेष ५ फॉगिंग मशिन्स महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला आज देण्यात आली. 

भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात हे मशीन देण्यात आली. ज्यांचा वापर मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही मशिन्स उपयोगात आणली जातील. या फॉगिंग मशीनची विशेषता अशी आहे की हे मशीन एकावेळी ६०० लिटर पेक्षा जास्त प्रवाही द्रव्य साठवू शकते आणि सतत दीड तास फवारणी करू शकते. तसेच जवळपास ३० चौरस मीटर इतके क्षेत्र एकावेळी कव्हर करू शकते.

स्वाध्याय परिवाराकडून याआधी वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या व्यक्तींसाठी मास्क आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच मुंबईप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर व नांदेड येथे पण अशा प्रकारची फॉगिंग मशिन्स स्वाध्याय परिवाराकडून देण्यात येणार आहेत तर गुजराथ मधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, भुज या शहरात अशी अनेक मशिन्स यापूर्वीच दिली गेली आहेत. त्याबरोबरच मास्क, हँडग्लोव्हस तसेच सॅनिटायझर असे एकत्र असणारे ३० हजार किट्स आजपर्यंत स्वाध्याय परिवाराने दिलेले आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे होत आहे. 

अर्थात स्वाध्याय परिवारातर्फे दिली जाणारी कुठलीही वस्तू किंवा संयंत्र कोरोना संक्रमणासारख्या या विपरीत काळात केवळ सामाजिक भान व नैतिक कर्तव्य म्हणून समाजाला दिलेले एक छोटेसे योगदान आहे. असे परिवाराकडून सांगण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, ही शासनाला केलेली मोठी मदत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी स्वाध्याय परिवाराचे आभार मानले.