एकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार- सुकाणू समिती

या वेळी सुकाणू समितीने 'एकच नारा ७/१२ कोरा' अशी घोषणाही दिली

Updated: Aug 12, 2017, 06:03 PM IST
एकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार- सुकाणू समिती title=

मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि सुकाणू समिती पून्हा एकदा आक्रमक झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरीत करावी अन्यथा येत्या १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा थेट इशारा सुकाणू समितीने दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सुकाणू समितीने हा इशारा दिला आहे.

या वेळी सुकाणू समितीने 'एकच नारा ७/१२ कोरा' अशी घोषणाही दिली. सुकाणू समितीतील आमदार बच्चू कडू, अजित नवले, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील,किशोर ढमाले आदी मंडळींनी ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी सुकाणू समितीने '15 तारखेला सर्व जिल्ह्यात पालक मंत्र्यांना झेंडा वंदन करण्या पासून रोखणार तसेच, 14 तारखेला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करणार',असा इशाराही दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन तीव्र करणार,  महाराष्ट्र ठप्प करणार, अशी प्रतिक्रीया अजित नवले यांनी दिली. मराठा मोर्चा मध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल जी मागणी केली त्याला ही सरकारने प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही नवले यांनी या वेळी केला. तर, सरकारने सरसकट कर्ज माफी केली नाही आणि इतर मागण्या ही पूर्ण झाल्या नाहीत म्हणून चक्का जाम आंदोलन करणार आहोत असे, राहुनाथ दादा पाटील म्हणाले.

दरम्यान, झेंडा वंदनाला आमचा विरोध नाही मात्र शेतकरी आत्महत्या अजून ही होतायंत. हे मंत्री पापी आहेत यांच्या पापी हस्ते ध्वजारोहण नको. एखाद्या शिपायांच्या हस्ते ध्वजारोहण केल तरी चालेल,अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.