कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई : ही कहाणी आहे एका मिरॅकल बेबीची. आईच्या गर्भात केवळ २२ आठवडे राहून वेळेपूर्वीच बाहेरच्या जगात पदार्पण केलेलं बाळ जगणं तसं कठीणच मात्र, मुंबईतल्या निर्वाणनं आयुष्याची ही लढाई जिंकलीय. गर्भात सर्वात कमी दिवस राहूनही सुदृढ म्हणून जगणारा निर्वाण आता देशातील पहिला मुलगा ठरलाय.
विशाल आणि रितिकाला अपेक्षा होती की ९ महिन्यानंतरच आपल्या बाळाचा जन्म होईल, परंतु गर्भातल्या त्या जीवाला इतकी घाई झाली होती की, तो साडेपाच महिन्यातच त्यानं या जगात प्रवेश केला. यामुळं आई-वडिलांबरोबरच डॉक्टरांचीही चिंता वाढली. कारण देशात आतापर्यंत २२ आठवड्यांचे मूल जगल्याचं एकही उदाहण नव्हते. परंतु डॉक्टरांचे प्रयत्न आणि या जोडीला निर्वाणची जगण्याची इच्छाशक्ती, यामुळं त्याच्या आयुष्याची दोरी बळकट झाली.
मे महिन्यात तो जन्माला आला तेव्हा तो केवळ एका तळहातावर मावेल एवढाच होता. वजन ६१० ग्रँम, लांबी ३२ सेमी आणि डोक्याचा आकार २२ सेमी. निर्वाणला १२ आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली, यांपैकी ६ आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता, निर्वाणची फुफ्फुसेही अपरिपक्व होती...या काळात त्याच्या मेंदूतही रक्तस्त्राव झाला. असंख्य अडचणींवर मात करत तो जगला. आता निर्वाणचं वजन ३.७२ किलो इतकं असून इतर सामान्य मुलांप्रमाणे तो जगू शकणार आहे.
विशाल आणि रितिकासाठी हे सर्व आश्चर्यजनक आहे. चार महिने एनआयसीयूत असलेल्या पोटच्या बाळाला आता घरी घेवून जाताना त्यांच्या यावर विश्वास बसत नाहीय.
आईच्या गर्भात केवळ २२ आठवडे एवढ्या अपु-या दिवसांची वाढ असलेला आणि जगलेला निर्वाण हा भारतातला पहिला प्रिमँच्युअर बेबी आहे. देशात १३ टक्के मुलं ही वेळेपूर्वीच जन्माला येतात. चांगल्या वैद्यकीय सुविधांअभावी यातील अनेकजण जग पाहू शकत नाहीत. निर्वाण मात्र याला अपवाद ठरलाय.