मंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी'

स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.. त्यासाठी प्रत्येकजण कसोशीनं प्रयत्नही करतो.. असाच एक शेतमजुराचा मुलगा मंत्रालय परिसरात स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय.. त्यासाठी त्यानं नवी आयडियाची कल्पना शोधलीये..

Updated: Aug 14, 2017, 08:05 PM IST
मंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी' title=

रवी जैस्वाल, झी मीडिया, मुंबई : स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.. त्यासाठी प्रत्येकजण कसोशीनं प्रयत्नही करतो.. असाच एक शेतमजुराचा मुलगा मंत्रालय परिसरात स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय.. त्यासाठी त्यानं नवी आयडियाची कल्पना शोधलीये..
 
हा ना नेता आहे, ना एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता... तो आहे साध्या ऊसतोड कामगाराचा मुलगा... आलम शेख असं त्याचं नाव... मंत्रालया शेजारच्या पार्किंगमध्ये आलमची मारुती 800 गाडी उभी असते... बड्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या गाडीला भेट देतात.. कारण नेत्यांना दिसायचं असतं रुबाबदार... आणि कार्यकर्त्यांना व्हायचं असतं पुढारी... त्यासाठी आलम त्यांना विकतो खास राजकारण्यांच्या पसंतीचे कपडे... खादी आणि लिननचे कपडे.. पुढारी नावाच्या या गार्मेंट शॉप ऑन व्हीलमुळं सध्या त्याचंच नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं... आलम पुढारी...

मुळचा बीड जिल्ह्यातल्या पाटोदाचा आलम मुंबईत आला तो पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी... त्याला आई-वडिलांना ऊस तोड मजुरीच्या जोखडातून मोकळं करायचं होतं.. शिवाय राजधानी मुंबईत आपली वेगळी छाप पाडण्याचं वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.. यातूनच त्याला ही आयडियाची कल्पना सुचली... कपड्यांच्या विक्रीतून आलमचा जवळपास 30 हजारांचा धंदा होतो.. यामध्ये निव्वळ 3 हजाराचा नफा मिळतो.. 

प्रामाणिकपणे प्रयत्न अन् थोडीशी मेहनत घेतली तर यश हे हमखास मिळतं.. हेच मराठवाड्यातील दुष्काळीभागातून येऊन आलमनं मुंबई सारख्या ठिकाणी सिद्ध केलंय.