दीपक भातुसे, मुंबई : राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या काचांवर दगडफेक केली गेली आणि कुंड्यांचेही मोठे नुकसान केले गेले. आंबेडकर कुटुंबियांकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेनंतर सर्वांना राजगृह परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. या माथेफेरु हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.