शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

महाराष्ट्रात एसटी महामंडळाचा वापर करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे, तरी एसटी तोट्यात का?

Updated: Dec 21, 2021, 04:18 PM IST
शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल title=

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आता एसटीतील भ्रष्टाचारावर चर्चा वाढताना दिसत आहे. यात आता वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी त्या शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या आहेत, त्या व्होल्वो बस कशा चालवल्या जातात, प्रति किलोमीटरचा हिशेब काय आहे? हे सर्व सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. फायदेशीर रुट कोणते आहेत, हे देखील एसटीने पुढे आणणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात एसटी महामंडळाचा वापर करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे, तरी एसटी तोट्यात का? असा सवाल एसटीतील भ्रष्टाचारावर उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे एसटीच्या भ्रष्टाचारावर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना, संपावर असलेल एसटी कर्मचारी हे बोलायला तयार नाहीत, यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी बोट ठेवलं आहे.

अनेक वर्षापासून शिवनेरीची सेवा एसटीकडून दिली जात आहे. तिचा नेमका किती फायदा किंवा तोटा एसटी महामंडळाला आहे, हे समोर येणं गरजेचं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एकंदरीत एसटीत कोणतंही व्यवस्थापन नसल्याने एसटी तोट्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पक्षाकडून काही मदत हवी असेल तर नक्कीच करु, पण विलिनीकरण हा विषय सोडून, कारण ३५ च्या वर महामंडळं आहेत. विकासासाठी वापरला जाणारा निधी पगारासाठी वापरला जाईल, तर ते योग्य नाही, पण एसटी फायद्यात आल्यास, किंवा चांगलं उत्पन्न आल्यास कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ येणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.