Kalyan Crime: शुक्रवारी रात्री उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर घडली आहे. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वाद होता. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पुत्र वैभव हे उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड गोळीबार केला.
या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले. सध्या त्यांना उपचारांसाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी गणपत गायकवाड यांनी पाच राऊंड फायर केले. सध्या गणपत गायकवाड यांना पोलीस ठाण्यात असून पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.
झी 24 तासशी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले, पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्त कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि मी फायरिंग केली. होय मी गोळीबार केला आणि मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. मला जीवे मारायचं नव्हतं, पण पोलिसांसमोर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे.
जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय. जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते, यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने आमदारांनी गोळीबार केला. गेल्या तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होतं. दरम्यान या प्रकरणानंतर आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.