मुंबई : पोलिसांची खार्की वर्दी बदलणार आहे, देशभरातील पोलिसांची खाकी बदलणार असल्याने तो गणवेश आता इतिहास जमा होईल असं म्हणण्यास हरकत नाही, मात्र पोलीस कर्मचारी आता स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसतील असंही म्हटलं जातंय.
हवामानाला साजेसा ड्रेस असेल
देशभरातील पोलिसांना सध्या खाकी वर्दी आहे. आता पोलिसांना सर्व हवामानात आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश दिला जाणार आहे. पोलिसांचा ड्रेस डिझाईन करण्याचं काम, अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे देण्यात आलं आहे. ही संस्था सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश ठरवणार आहे.
पोलिसांच्या वर्दीचे ९ नमुने
वर्दीचे ९ नमुने, ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिव्हलपमेंटच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचं डिझाईनही बनवलं आहे. या संस्थेने बनवलेली डिझाईन्स, सर्व राज्यांच्या पोलिसांना शेअर केलं आहे, त्यावरून ते आपल्या पसंतीने गणवेश निवडतील.
देशभरातील पोलिसांची वर्दी सारखी असू शकते
सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत, हे ९ राज्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार दिसून आलं आहे. देशातील पोलिसांच्या वर्दीत समानता नाही. पोलिसांच्या गणवेशाचं कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होता. तसेच वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची सोय नाही.
टोपीही बदलू शकते
उन्हाळ्यात डोकेदुखीचं कारण पोलिसांची टोपी लोकराची असल्याने ठरते, असं सांगण्यात येतं, तर हेल्मेट एवढे जड आहेत की आपत्कालीन परिस्थितीत ते घालणं अडचणीचं ठरतं. पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्ट्यात फोन ठेवण्याची जागा आणि स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी, याकडे लक्ष दिलं जाणार आहे.
बुटं कापडी असू शकतात...
पोलिसांसाठी चामड्याची बुटं जास्त वेळ घालणं सोपं नसतं. तसेच खाकी रंग प्रायव्हेट एजन्सी आणि इतर विभागातील लोकही वापरतात. 'खाकी वर्दीवर फारच टीका होते. यात बदल होणं आवश्यक आहे. सध्याची वर्दी पोलिसांसाठी सर्व प्रकारच्या हवामानात परिधान करण्यासाठी योग्य नाही. याला पर्याय आणणं गरजेचं आहे', असंही आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे.