मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेल्या जिम, शॉपिंग मॉल्स आणि स्विमिंग पूल सुरु करण्यास लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत याबाबतचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल आणि स्विमिंग पूल सुरु करण्याबाबत विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. आरोग्य विभाग सध्या यासाठीच्या मार्गदर्शक सूचीवर काम करत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
यावेळी राजेश टोपे यांनी पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही भाष्य केले. आता पुण्यातही मुंबईप्रमाणे मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील, अशा टेस्ट आल्या आहेत. त्याचे किट सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे ठेवावेत. कोणत्याही रुग्णाला परत पाठवून दिल्याची तक्रार समोर आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला. दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण आढळून आले. तर २८० जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२% एवढे आहे.
'लोकल ट्रेन सुरु करायची की नाही ते मुख्यमंत्री ठरवतील'
मुंबईत अगदी विरार, कल्याण भागातून दररोज असंख्य लोक कामावर येतात. त्यांच्यासाठी लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी रास्त आहे. पण ट्रेनमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरु करायची की नाही, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.