मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बरेच दिवस उलटले असले तरीही सत्तास्थापनेच्या बाबतीत मात्र कोणतंही चित्र स्पष्ट नाही. शिवसेना- भाजपच्या महायुतीतील सध्याचं चित्र पाहता 'झी २४ तास'च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
सत्तेच्या गणितांना उलगडा करत असतानाच राम मंदिराच्या मुद्द्यावरही राऊत यांनी कटाक्ष टाकत भाजपला इशारा दिला. गेल्या बऱ्याच काळापासून अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. पण, आम्हाला हे मंदिर म्युझियम म्हणून उभारायचं नाही असं त्यांनी थेट शब्दांत स्पष्ट केलं.
भाजपने युती करतेवेळी दिलेली वचन, दिलेला शब्द पाळला नसल्याची बाब अधोरेखित करत राऊत यांनी हा टोला लगावला. आम्ही सत्यवचनी रामाचं मंदिर बांधत आहोत, असं सांगत दिलेल्या शब्दाचं भानच नसेल तर मंदिराचं नावही घेऊ नका असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर असणारा कल पाहता हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाचे पाईक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण, सरतेशेवटी भाजपकडून शब्द पाळला जात नसल्याचाच सूर त्यांनी आळवला.
भाजपसोबतची आमची युती ही वैचारिक तत्वांवरच होती, असं राऊत यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं. आपण (शिवसेना) कायमच सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवली असल्याचं सांगत विरोधी पक्षनेतेपदी येण्याच्या उद्देशाने आम्ही लठलो नाही असं सांगत जरी अशी वेळ आली तरी ती भूमिकासुद्धा तितक्याच ताकदीने पेलल्याचं मत त्यांनी मांडलं. पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेची वृत्ती नसून, छातीवर वार झेलण्याची शिवसेनेची वृत्ती असल्याचं त्यांनी सर्वांनाच स्मरणात आणून दिलं.