संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, दोन्ही कन्या ईडीच्या रडारवर? हे आहे कारण

ईडी कारवाईवरुन भाजपला इशारा देत संजय राऊत म्हणाले '2024 तक चलेगा...पर हम झुकेंगे नहीं!

Updated: Feb 3, 2022, 04:21 PM IST
संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार,  दोन्ही कन्या ईडीच्या रडारवर? हे आहे कारण title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना काल ईडीने  (ED) अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्या चौकशीत त्यांचे सहकारी सुजित पाटकर (Sujit Patkar) यांचं नाव समोर आलं.

यानंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला आहे. सुजित पाटकर हे मॅग्पी डीएफएस प्रा. लि कंपनीमध्ये भागिदार आहेत. तर संजय राऊत यांच्या  पूर्वाशी आणि विधीता या  दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागिदार आहेत. त्यामुळे त्याही ईडीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे सुजित पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने संयुक्तपणे अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ईडीकडून अलीबाग इथल्या जमिन व्यवहाराचीही चौकशी सुरु आहे.

प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक
मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचाळ जमीन घोटळ्याप्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना काल अटक केली असून त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा जमीन घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवीण राऊत हे HDILची सहाय्यक कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत संचालक आहेत. 

संजय राऊत यांचा संताप

दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई सुरु आहे, आधी लालच दाखवली, मग ऑफर्स दिल्या, त्यानंतर धमकावलं, तरीही झुकले नाही म्हटल्यावर कुटुंबीयांना धमकावलं जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया। चलता है, 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नहीं! असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.