भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता

शिवसेना-भाजपमध्ये नाराजीची दर आणखी वाढण्याची शक्यता

Updated: Jun 11, 2019, 12:25 PM IST
भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक युतीत लढवण्याचा शिवसेना-भाजपचा निर्णय पक्का असला तरी आता दोन्ही पक्षांमध्ये विविध मुद्यांवरून नाराजीची दरी वाढताना दिसत आहेत. आधी पन्नास पन्नास टक्के जागा वाटपाबाबत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेत नाराजी होती. तर आता मुख्यमंत्री भाजपचाच असेल याबाबत भाजपकडून आखण्यात आलेल्या रणनीतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा युतीमधला जुना फॉर्म्युला, आताही हा फॉर्म्युला कायम असला तरी विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करा असे फर्मान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले आहे. त्यामुळेच शिवसेनेतील अस्वस्थता वाढली आहे. नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे 288 पैकी 228 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट अमित शहा यांनी ठेवलं आहे. मात्र हे टार्गेट पूर्ण करताना मुख्यमंत्री भाजपचाच होईल याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री भाजपाचाच करायचा या अमित शहा यांनी ठेवलेल्या टार्गेटमुळे निश्चितच शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा अशी डरकाळी शिवसेनेने अनेकदा फोडली आहे. त्यामुळेच भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेतील सूत्रांनी म्हटलं आहे की, 'युती करताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे जाहीर केलं आहे त्यात थोडाही फरक होणार नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल या सुधीर मुनगुंटीवार यांच्या वक्तव्याला कुणीही महत्त्व देऊ नये.'

यापूर्वी जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी होती. 288 पैकी भाजप आणि शिवसेना 135-135 जागा लढवतील. उरलेल्या 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील. युतीतील सर्व मित्रपक्ष हे भाजपबरोबर आहेत आणि त्यांनी भाजपाच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी असा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणजे प्रत्यक्ष भाजपच्या कमळावर 153 आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर 135 जागा लढवल्या जातील. अशात जास्तीत जास्त आमदार  भाजपचे निवडून आणण्याची रणनीती आखून पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच बनवण्याची रणनीती अमित शहांनी आखली आहे. मात्र यातून युतीत नाराजीची दरी आणखी वाढणार आहे.

युतीत 1995 साली जास्त जागा जिंकत शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं. त्यानंतर 1999 साली झालेल्या निवडणुकीत आपल्या जास्त जागा निवडून आणून मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या स्पर्धेत युतीत एकमेकांच्या जागा पाडण्याचा प्रयत्न झाला होता. आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही आता मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष चिघळण्याची चिन्हं असून त्यातून पुन्हा एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.