Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार?

नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे.

संजय पाटील | Updated: Aug 3, 2022, 05:12 PM IST
Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे. मातोश्रीवर उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी बंडखोरावंर हल्लाबोल केला. (shiv sena party chief uddhav thackeray slam to rebel mlas during to jalgaon office bearer at mumbai)

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

"गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असं बोलू नका. बैल शेतकऱ्यांचा राजा आहे. कालच नागपंचमी झाली, असं बोलतात कि नागाला किती दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच. या सर्वांना (बंडखोरी केलेल्या आमदारांना उद्देशून) निष्ठेच दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली", अशा शब्दात ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला. ठाकरेंनी मातोश्रीवर जळगावमधील पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ही टीका केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंसोबत जात बंडखोरी केली. त्यामुळे आता जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव वाघ यांची नियुक्ती केली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरेंनी "जळगावात भाजपने गुलाब पाहिला आता सैनिकांचे काटे पाहायचेत. जळगाव मध्ये एक गुलाब गेले, दुसरे गुलाबराव वाघ आपल्या सोबत आहेत", असं स्पष्ट केलं.

"आता मी राज्यभर फिरणार आहे तेव्हा सविस्तर बोलेन. सदस्य नोंदणी वर भर द्या. सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या. विधानसभेच्या निवडणुकांत मग दाखवून देऊ", असा इशाराही ठाकरेंनी यावेळेस दिला.

दरम्यान शिवसेनेने गुलाबराव वाघ यांची नियुक्ती केल्याने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे असे 2 गुलाब आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता कोण कोणावर वरचढ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.