मुंबई: बेस्टच्या संपाचे नेतृत्त्व करणाऱ्या शशांक राव यांचा बोलविता धनी वेगळाच होता, असा आरोप शिवसेनेने गुरुवारी केला. या आरोपांनंतर शशांक राव यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधत शिवसेनेवर पलटवार केला. शशांक राव यांनी म्हटले की, शिवसेना बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते कमी करायला निघाली होती. तसेच बेस्टचे खासगीकरण करण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, आता यापैकी काहीच होणार नाही, ही गोष्ट शिवसेनेला खटकत असल्याचे शशांक राव यांनी सांगितले. तसेच आपण अनिल परब यांनी मागणी केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या पगाराची पे स्लीप दाखवायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबई | कामगारांचा नवा नायक... शशांक राव
बेस्टच्या संपाची स्क्रिप्ट दुसऱ्यानेच लिहिली होती, शशांक राव हे केवळ निमित्त होते, असा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, शिवसेना पहिल्या दिवसानंतर संपातून बाहेर पडली. त्यामुळे बाहेर जाण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली हे अनिल परबांना माहिती असायला पाहिजे, असे उत्तर शशांक राव यांनी दिले. तसेच संपावेळी कामगारांची ग्रेड वाढवण्यापेक्षा बेस्ट जगणे, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा होता. बेस्टचे महानगरपालिकेत विलीनीकरण करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय होत नव्हता. मात्र, आता न्यायालयाने तीन महिन्यांच्या आतमध्ये हा निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मध्यस्थाची नेमणूकही केली आहे, याकडे शशांक राव यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेने या संपातून माघार घेतल्यानंतरही शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कृती समितीने यशस्वीपणे संप पुढे रेटला होता. यावरून शिवसेनेला बऱ्याच टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तसेच शशांक राव यांच्या एकट्याच्या नेतृत्त्वाखाली संप यशस्वी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला एकप्रकारे धक्का लागला होता.