मेट्रो-3 च्या कारशेडसाठी आता या जागेची चाचपणी

 मेट्रोच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता

Updated: Dec 17, 2020, 08:37 PM IST
मेट्रो-3 च्या कारशेडसाठी आता या जागेची चाचपणी  title=

मुंबई : मुंबईत कांजूरमार्ग येथे कार शेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचा परिणाम मेट्रोच्या कामावर होऊ नये, यासाठी मेट्रो ३ ची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारता येईल का, याबाबतची चाचपणी सुरू झाल्याचं समजतं आहे. 

बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर ही कारशेड उभारता येईल का, यादृष्टीनं चाचपणी करण्यात येतं आहे. आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर कांजूरमार्गमध्ये कारशेडचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र हायकोर्टानं त्यास स्थगिती दिली असून, याबाबतची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार आहे. 

ही न्यायालयीन प्रक्रिया लांबणार असल्यानं मेट्रोच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचं म्हणजे बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर मेट्रो-3 साठी पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. याआधी आरेमध्ये कारशेडचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात झाला होता. ज्याला शिवसेनेने विरोध केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच आरेमधील कारशेडला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा निश्चित करण्यात आली. याता कोर्टाने कांजूरच्या कामाला स्थगिती दिली आहे.