घर घेणाऱ्यांना 'SBI'ची गुडन्यूज, कर्ज घ्या बिनधास्त राहा । पाहा काय आहे योजना?

तुम्ही जर घर घेत असाल आणि तुम्हाला होम लोन (गृहकर्ज) घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्या. कारण...

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 9, 2020, 06:18 PM IST
घर घेणाऱ्यांना 'SBI'ची गुडन्यूज, कर्ज घ्या बिनधास्त राहा । पाहा काय आहे योजना? title=

मुंबई : अनेकांचे स्वप्न असते स्वत:चे घर असावे. मात्र, काही वेळा पैसे भरुनही बिल्डर वेळेवर रुमची (फ्लॅट) चावी देत नाही. किंवा प्रकल्प अर्धवट राहतो अथवा पूर्ण केला जात नाही. त्यामुळे घरासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा घर घेणाऱ्यावर पडतो. घर मिळत नाही. मात्र, बँकेचे कर्ज घेतल्याने व्याज आणि हप्ता याच्यात घर घेणारा पिचलाच जातो. त्यामुळे घर घेण्यासाठी कर्ज नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ येते. आता तुम्ही जर घर घेत असाल आणि तुम्हाला होम लोन (गृहकर्ज) घ्यायचे असेल तर बिनधास्त घ्या. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकेने एक चांगली बातमी दिली आहे. 

घर खरेदी करताना आपल्या मनात सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे, जर प्रकल्प अडकला तर गृहकर्ज - गृह कर्जाचा बोजा अनावश्यकपणे वाढेल. परंतु आता नवीन प्रकल्पात गृह कर्जाचा त्रास तुम्हाला होणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ही नवी योजना आणली आहे. जी आपल्याला चिंतामुक्त करेल. बँकेच्या नव्या योजनेनुसार जर प्रकल्प कोणत्याही कारणास्तव उशीर झाला किंवा थांबला तर एसबीआय गृह कर्जाची भरपाई करेल.

तुम्ही चिंता न करता एसबीआयचे कर्ज घेऊ शकता. प्रकल्प रखडला किंवा थांबला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी 'एसबीआय'ने गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. निर्माणाधीन (under construction) गृह प्रकल्पांत घर खरेदी करणाऱ्या कर्जदाराला निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळाला नाही तर कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. 

एसबीआय अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, आता जर ग्राहकांनी अपार्टमेंट प्रकल्प उशिरा किंवा थांबवला तर बँक स्वतःच पैसे परत करेल. ही योजना अशा प्रकल्पांसाठी आहे ज्यात एसबीआय एकमेव कर्ज देणारी बँक आहे. जर बिल्डरने रेरा - रिअल इस्टेट रेग्युलेशनडेव्हलपमेंट कायद्याअंतर्गत (Real Estate Regulation and Development Act) (RERA) आपल्या मुदतीच्या काळात प्रकल्प पूर्ण केला नाही, तर बँक कर्जाची रक्कम परत करेल. म्हणजेच ग्राहकाला विनाकारण गृहकर्ज परतफेड करण्याची आवश्यकता नाही.

एसबीयच्या धोरणामुळे नवीन प्रकल्पांना गती मिळेल. काही लोकांनी ज्या गृहप्रकल्पात पैसे गुंतवले होते. मात्र, ते प्रकल्प रखडल्याने खरेदारांची पाठ फिरली होती. परंतु बँकेच्या नव्या योजनेमुळे घर खरेदीसाठी अनेक जण पुढे येतील. अनेक ग्राहकांनी पैसे गुंतविले प्रकल्प थांबविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे गृहप्रकल्प बंद झाला तरी गृहकर्ज परतफेड करण्यात खरेदीदारास कोणताही दिलासा किंवा सवलत मिळत नव्हती. तसेच कोणतेही संरक्षण मिळत नव्हते. कारण कर्जाचा बोजा आणि घर न मिळाल्याने ग्राहकांना दुप्पट फटका बसायचा. आता एसबीआयची नवीन योजना बाजारात नवीन खरेदीदार आणेल अशी अपेक्षा आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी रेरासारखे (RERA) नियंत्रक असले तरी ग्राहकांना निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळावा, यासाठी त्यांना भरोसा देणे आवश्यक आहे. ही योजना फायदेशीर ठरेल, असे कुमार यांनी सांगितले. बिल्डरला प्रोजेक्ट्सला ताबा प्रमाणपत्र मिळेपर्यंत बँक गृहकर्जाची हमी घेईल. यामध्ये बँक, बिल्डर आणि ग्राहक या तिघांना समसमान संधी असतील, असे कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील गृहकर्ज व्यवसायात 'एसबीआय'चा २५ टक्के वाटा आहे. बँकेने 'रेसिडेंशिअल बिल्डर फायनान्स विथ बायर ग्यारंटी स्कीम' सुरुवातीला मुंबईसह देशभरातील सहा प्रमुख शहरांमध्ये लागू केली आहे. नुकताच बँकेने कर्जदारात कपात केली होती. बँकेचा गृह कर्जाचा दर ८ टक्के केला आहे. त्यामुळे नवीन घर खरेदीला चालना मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.