मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने काल रात्री उशीरा अटक केली आहे. ईडीने काल त्यांच्या घरी 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी दुपारी 5 च्या दरम्यान ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर जवळपास 8 तास ईडी कार्यालयात चौकशी केली. अशा 17 तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने रात्री उशीरा अटक केली.
आज त्यांना सकाळी वैद्यकीय चाचणीसाठी बाहेर काढलं जाईल. यासाठी जे.जे. रुग्णालयात नेलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना 11 वाजल्यानंतर विशेष PMLA कोर्टात नियमाप्रमाणे हजर केलं जाईल. ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीला तपास यंत्रणा अटक करते, तेव्हा 24 तासांच्या आतमध्ये तपास यंत्रणेला त्या व्यक्तीला किंवा आरोपीला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर करावं लागतं.
संजय राऊत यांना विशेष PMLA कोर्टात हजर केल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी संजय राऊत यांचा रिमांड म्हणजेच ताबा काही दिवस मागण्याची शक्यता आहे. तर याला साहजिकच संजय राऊत यांचे वकील विरोध करण्याची शक्यता आहे.
दरम्यान आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेखच नाही असा दावा संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. खोट्या आरोपात संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.
आता नक्की कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे आहे याप्रकरणात संजय राऊत दोषी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.