मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचं दिसत आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.
संजय निरुपम यांनी म्हटलं की, राज ठाकरेंनी परवानगी नसताना मोर्चा काढला, फेरीवाल्यांना अल्टिमेटम दिलं आणि आजपर्यंत राज ठाकरेंवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, माझ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वत्र फेरीवाला, ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करा, फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतला जातो. मनसेचे कार्यकर्तेच फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतात असाही आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
मालाडमध्ये मनसे फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना पून्हा हटवण्यास सुरुवात केली.
मनसेची सुरु असलेली गुंडगिरी संपली पाहीजे असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी कायदा हातात घेऊन चोख प्रत्युत्तर द्या असे वक्तव्य संजय निरुपम यांनी केलं. त्यामुळे संजय निरूपम यांच्याविरुद्ध रविवारी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.