मुंबई : काँग्रेस नेते संजय निरूपम आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन पुकारलं असताना, संजय निरूपम हे फेरीवाल्यांच्या मागे उभे ठाकले आणि यानंतर मनसे आणि संजय निरूपम यांच्यात संघर्ष सुरू झाला.
मनसेने मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाची तोडफोड केली, यानंतर संजय निरूपम यांनी 'इसका करारा जवाब दिया जाएगा', असं म्हटलं होतं, पण त्याआधीच, मनसेने संजय निरूपम यांच्या निवासस्थानासमोर व्यंगचित्राचं पोस्टर लावलं आहे.
या पोस्टरनंतर काँग्रेस नेते संजय निरूपम आणि मनसे यांच्यातील वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या विरोधातील मनसेच्या आंदोलनात उडी घेतल्याने, या आंदोलनाला परप्रांतीय वादाचं स्वरूप आलं आहे.
वांद्रे येथील काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली. मात्र, हे नेमके कुणी केले, हे अजून समजू न शकल्याने पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही.
दरम्यान काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसे नेते संजय निरूपम यांच्यासह ८ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीएसटी येथील आझाद मैदानसमोरील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांवर आहे.