मुंबई : आपण गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न आम्ही करीत आहोत. आरक्षण हा दीर्घ कालीन लढा आहे. ते नक्की कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या 22 मागण्या पुढे आल्या त्यापैकी 6 मागण्या आम्ही मांडल्या आहेत. त्या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. त्यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही. या मागण्यांसाठी न्यायालयाचे कोणते निर्बंध आहे असेही काही नाही.असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ते आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करीत असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
या मागण्या आम्ही या आधीपण अनेकदा मांडल्या आहे. आज उपोषणामुळे होणारा त्रास मी समाजासाठी सहन करणार आहे. कोणताही अहंकार मनात ठेवण्यापेक्षा समाजाचा प्रश्न मार्गी लागणं महत्वाचं आहे. मी माझ्या समन्वयकांना वर्षा बंगल्यावर पाठवले आहे. मराठा समाजाच्या मागण्या ते पुन्हा तेथे मांडणार आहेत. असेही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटलं.
समन्वयकांनी माझी विनंती आहे की, कोणताही कायदा हाती घेऊ नये. शासनासमोर आपल्या मांडण्या योग्य पद्धतीने मांडा. लोकशाहीमध्ये पदावर असलेल्या लोकांसमोर आपल्याला मागण्या मांडाव्या लागतात. म्हणून तुम्हाला वर्षावर पाठवतोय. असेही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.