मुंबई : बहुचर्चित शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षक विभाग पावलं टाकत असून पुढच्या आठवड्यात या बाबतची जाहिरात प्रसिद्ध होण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत. मात्र असं असलं तरी २४ हजार जागांपैकी १० ते १५ हजार जागांवरच भरती होणार असल्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे २४ हजार जागांची शिक्षक भरती करण्याचं शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन हवेतच विरणार की काय अशी शंका व्यक्त होते आहे. खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षक भरती ही पवित्र प्रणालीतून वगळण्यात आल्याने जागा कमी झाल्या असल्याचं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितलं आहे. दरम्यान पदवीधर शिक्षकांच्या भरती बाबत नियमावली नसल्याने ४ हजार जागांवर भरती होणार की नाही याबाबतही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे २४ हजार जागांची भरती हा केवळ फार्सच असल्याचा आरोप होतो आहे.
राज्यात शिक्षक भरतीचा महत्त्वाचा विषय आजही प्रलंबित आहे. लाखो तरुण तरुणी उच्च शिक्षित असूनही बेरोजगार आहेत. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी देऊन आता तब्बल वर्ष उलटले. अजूनही प्रत्यक्षात शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातल्या तब्बल १ लाख ७८ हजार तरुण आजही नोकरीच्या आशेवर आहेत. डी.एड आणि बी.एड शिक्षण पूर्ण करुन सरकारने शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी जाहीर केली. ही परीक्षाही उमेदवारांनी पार पाडली. मात्र, यालाही वर्ष उलटले तरी राज्यात शिक्षक भरती झालेली नाही.
एकाबाजूला राज्यातल्या जिल्हा परिषद, महापालिका, आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे हजारो तरुण शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीनुसार...
- पहिली ते नववीसाठी २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत
- नववी ते बारावीसाठी ११ हजार ५८९ जागा शिक्षकांसाठी रिक्त आहे
- तर यासाठी तब्बल १ लाख ७८ हजार डीएड बीएडधारकांनी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता चाचणी दिली आहे.