मुंबई : भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली असल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नसल्याची बाब माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने दिल्याचे वृत्त आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर नव्याने ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. तसेच १०, २०, ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या गेल्या आहेत. दरम्यान, ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली.
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने आरबीआयकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना आरबीआयने चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नाही, अशी माहिती दिली आहे, असे वृत्त 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. २०१८-१९मध्ये ४.६६ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने उत्तरादाखल दिली आहे.
सध्या चलनात २००० रुपयांच्या नोटा कमी दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी एटीएममधून २००० रुपयांच्या नोटाही येत नाहीत. ५०० आणि २००, १०० रुपयांच्या नोटाच मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. २०१८-२०१९मध्ये चलनातील २०००च्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या, अशी माहिती आहे.