मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) मुंबईतल्या आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) संप सुरु आहे. भाजप नते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) संपाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलित महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी मविआ सरकारला इशारा दिला.
ठाकरे सरकारला जागं आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी, मी तुमच्या आहे पाठिशी, सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं.
हे सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झालं असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.