काँग्रेसकडून राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला

Updated: Mar 12, 2020, 07:59 PM IST
काँग्रेसकडून राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी title=

मुंबई : काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी माजी खासदार राजीव सातवांना जाहीर केली आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातवांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचा पत्ता कापला गेला आहे. सातवांना गुजरात आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत यशस्वीरीत्या काम केल्यामुळे त्यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते. यानंतर २०१९ सालच्या निवडणुकीत सातव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यसभेवर महाराष्ट्रातून ७ खासदार जाणार आहेत. यातले ४ जण महाविकासआघाडीकडून तर ३ जण भाजपकडून राज्यसभेवर जातील. भाजपने उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकासआघाडीने राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकासआघाडीच्या चौथ्या उमेदवाराबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही. चौथ्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आग्रही आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या फौजिया खान या उमेदवारी अर्ज भरतील, असं बोललं जात होतं. चौथ्या जागेचा हा तिढा महाविकासआघाडीच्या समन्वय समितीमध्ये सोडवला जाईल, असं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.