हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, राज ठाकरे पुन्हा आक्रमक
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात आज जाहीर सभा घेतली. या सभेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. मनसेने (MNS) देखील या सभेला उत्तर सभा असे नाव दिले होते. राज ठाकरे यांनी सभेत बोलताना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग काढण्यासाठी त्यांनी 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे.
'इतरांना त्रास देऊन तुम्ही प्रार्थना करा असा कुठलाही धर्म सांगत नाही. मशिदीवरच्या भोंग्याच्या आवाजामुळे त्रास होतो. रस्ता घाण झाला तर रस्ता साफ केला जातो. त्यामुळे कानाला त्रास होत असेल तर भोंगे हटवले पाहिजे. मनसे भूमिका मागे घेणार नाही. मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी सभेत बोलताना अनेक नेत्यांचा समाचार घेतला. त्यांनी अनेक नेत्यांनी केलेल्या टीकेला ठाकरी भाषेत उत्तर दिलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंगे आणि मदरसे याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तीच भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. जेथे जेथे मशिदीवर भोंगे असतील तेथे हनुमान चालिसा लावण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.