परतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यभरात ११ बळी

दरवर्षीच्या तुलनेत पावसाने यंदा चागलीच हजेरी लावली. पावसाचे सरासरी प्रमाण हे कमी असले तरी, बळीराजा सुखावला. परतीच्या पावसाचीही राज्यावर विशेष कृपादृष्टी झाली. पण, जाता जाता पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ११ बळी घेतले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 7, 2017, 10:00 AM IST
परतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यभरात ११ बळी title=

मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत पावसाने यंदा चागलीच हजेरी लावली. पावसाचे सरासरी प्रमाण हे कमी असले तरी, बळीराजा सुखावला. परतीच्या पावसाचीही राज्यावर विशेष कृपादृष्टी झाली. पण, जाता जाता पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ११ बळी घेतले.

शुक्रवारी सायंकाळी आकाशात ढगांची दाटी, सोसाट्याचा वारा तसेच प्रचंड प्रमाणात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. कोणतेही वातावरण नसताना अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातीरपीट उडवली. त्यामुळे शेतीची कामे अर्ध्यावरच खोळंबली. काही ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आले. शहरांमध्ये वाहतुक कोंडी झाली. काही ठिकाणी इमारतीची पडझड झाली. तर, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह चाकरणामन्यांना पाऊस थांबन्याची वाट पहावी लागली. राजधानी मुंबईसह, मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, आणि पश्चि महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात चांगलाच पाऊस झाला. या पावसात तब्बल ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

राज्यात ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने आगोदरच दिला होता. वेधशाळेचे हे भाकीत खरे ठरले. अलिकडील काळात यापूर्वीही वेधशाळेचे भाकीत खरे ठरले होते. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडला होता.

प्राप्त माहितीनुसार, सोलापूरातील मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघेजण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. पालघरमध्येही वीज कोसळल्यामुळे चौघांना आपले प्राण गमवावे लागले. धुळ्यात तीन महिला तर, जालन्यात एकाचा वीज पडून बळी गेला. वीज कोसळून ठार झालेल्यांपैकी एका व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुक्या प्राण्यांनाही मोठा फटका बसला. काही शेतकऱ्यांकडील पाळीव प्राण्यांचा या पावासत बळी गेला. तर, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक इमारतींवरचे छत उडून गेले. काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. खास करून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे पके जमीनीवर पडली. तर, फुलोऱ्यात आलेल्या आणि फळधारणा झालेल्या पिकांचे मोठे नुकसाना झाले. गेली अनेक वर्षे दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा मेघराजाने चांगले दिवस दाखवले खरे. पण, जाता जाता अनेकांवर वक्रदृष्टी करत पावसाने बुरे दिनही दाखवले.