पावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग

 देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल उशिरा जाग आली. 

Updated: Sep 6, 2019, 11:41 AM IST
पावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग title=

मुंबई : मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर रेल्वेचे तिन्ही मार्ग साचलेल्या पाण्याने ब्लॉक झालेत. ४ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबईकर रेल्वे प्रवासी हाल अपेष्टा सोसत असताना देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल सकाळी उशिरा जाग आली. मध्यरात्री सव्वातीन वाजता गाड्या सुरू झाल्यावर रेल्वेमंत्र्यांनी काल सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी ट्विट करून गाड्या सुरू झाल्याची माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांचे ट्विटही प्रचंड संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

लाखो मुंबईकरांचे हाल, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला

मुंबईतील लोकलचे तिन्ही मार्ग बंद होते. तर मोनो रेलची सेवा सुरु होती. प्रचंड गर्दी झाल्याने नाजूक मोनो बंद पडली. चेंबूरपर्यंत मोनो धापा टाकत दोन ते तीन तासाने प्रवासी  पोहोचत होते. एकीकडे लाखो मुंबईकर त्रस्त असताना रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. ते देवदर्शनात मग्न होते. साधी कोणतीच प्रतिक्रिया ही त्यांनी मुंबईच्या या लोकल समस्येवर दिली नाही. लाखो प्रवाशी एकीकडे घराबाहेर होते. ८ ते १० तासांपासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प होती. पण रेल्वे मंत्री पियुष गोयल मात्र बेजबाबदारपणेच वागत असल्याची प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया आहे.

रेल्वे उपाययोजनेवर रेल्वेमंत्र्यांचं एकही ट्विट आलेले नाही. प्रसार माध्यमांना देखील त्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आज पियुष गोयल यांनी सकाळपासून काही ट्विट केले, पण त्यांनी मुंबईकरांबद्दल कोणतेच ट्विट केलं नाही. मुंबईचे असून ही पियुष गोयल यांनी मुंबईकरांची जराही दखल घेतली नाही. जे ट्विट केले ते उशिरा केले. तेही दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ तारखेला. त्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.