मुंबई: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा एकट्या राहुल गांधी यांच्यामुळे झालेला नाही. राज्यातील अपयशाची जबाबदारी माझी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नव्हते. सर्व निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत झाले होते. त्यामुळे पराभवाची जबाबदारी ही एकट्या राहुल गांधींची नाही. राज्यातील अपयशाची जबाबदारी मी व्यक्तीगतरित्या स्वीकारतो, असे चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधींचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीनं फेटाळला
तसेच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली. त्यांनी भाजपची बी टीम म्हणून काम केले. मात्र, यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही निकाल तसाच लागेल, असे मानायचे कारण नाही. परंतु, अनेक जिल्ह्यांमध्ये विचारपूर्वक राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक नेत्यांवर कारवाई करायची गरज आहे. या नेत्यांचा रिपोर्ट आपण पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. तसेच येत्या काळात काय बदल करायचे, यासाठी बैठक घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या नकारात्मक प्रचारामुळे पक्षाचा पराभव; काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुजबूज
यावेळी पत्रकारांनी त्यांना नारायण राणे यांच्या काँग्रेसमधील घरवापसीविषयीही प्रश्न विचारले. यावर चव्हाण यांनी म्हटले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. मी त्यांच्याशी बोललेलो नाही किंवा प्रदेश स्तरावर आम्हाला याबद्दली माहिती देण्यात आली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.