देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या ईडी (ED) मार्फत चौकशी सुरू आहे या चौकशी वरून काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करत आहेत. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत.
13 जूनला केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला होता.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान अशी काँग्रेसची नेतेमंडळी हजर होती.मुं बई काँग्रेसतर्फे ईडीच्या विरोधात आतापर्यंत मुंबईत तीनदा आंदोलन केलं आहे
नागपूरतही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला होता. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आता 16 जूनला काँग्रेसचे कार्यकर्ते थेट राजभवनवर धडकणार आहेत. या मोर्चात काँग्रेसचे सर्व नेते सहभागी होणार आहेत. शिवाय 17 जूनला मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसमार्फत केंद्र सरकारच्या विरोधात आणि ईडी च्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी आणि अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही.
काँग्रेस पक्ष, सोनिया आणि राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.