मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्य़ाची बातमी राजकीय वर्तुळातून आली होती. पण या वृत्ताचं विखे-पाटील यांनी खंडन केलं आहे. त्यांनी अजून राजीनामा दिला नसल्य़ाचं म्हटलं आहे. 'मी पक्षश्रेष्टींना भेटून चर्चा घेईल असं याआधीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केलं होतं. मुलगा सुजय विखे- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वाधिक कोंडी राधाकृष्ण विखे पाटलांची झाली आहे. भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची यादी त्यांच्यासमोर होती. याआधी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील मुलाचा भाजप पक्षप्रवेश रोखू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची पुरती गोची झाली होती.
काँग्रेसमधूनच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विखेंचे विरोधक बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल केला होता. राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचा समोर येऊन सगळ्यात आधी निषेध करायला हवा होता अशा शब्दांत थोरातांनी टीका केली होती. काँग्रेसने विखे कुटुंबीयांना आतापर्यंत भरभरून दिलं. मात्र पुत्र हट्ट करतो म्हणून दुसऱ्या पक्षात जाणे हे विखेंना शोभणारं नाही असंही थोरातांनी म्हटलं होतं. तसंच राधाकृष्ण विखे राजीनामा देऊन भाजपत गेले तर विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्यास तयार असल्याचंही थोरातांनी म्हटलं होतं.
नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील मुलाच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार करणार का? सभागृहात तरी आता राधाकृष्ण विखे पाटील ताकदीनं राज्य सरकारविरोधात आवाज कसा उठवणार असे प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर उपस्थित झाले होते. या विविध प्रश्नांनी राधाकृष्ण विखे पाटलांची पुरती कोंडी केली होती. इतर पक्षांनीही या निमित्ताने त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
याआधी विखे-पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका करत आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. विखे कुटुंबियांबद्दल पवारांच्या मनात द्वेष आहे. वडिलांच्या बाबतीत त्याच जुन्या गोष्टी जर पवार साहेब पुन्हा काढत असतील तर का निवडणुकीचा प्रचार करावा. माझे वडील हयात नसताना देखील त्यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने दु:ख झालं. याबाबत मी पक्षश्रेष्टींना भेटून चर्चा करणार आहे. यानंतर पुढचा निर्णय घेईल. असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
अहमदनगर मी गेलो तरी त्यांना संशय येईल त्यामुळे मी नगरमध्ये प्रचाराला जाणार नाही. राजकारणात काही सीमा असतात. त्याचं उल्लंघन केलं तर त्यावर तडजोड करुन ती स्विकारली जाणार नाही. असं देखील विखे-पाटील यांनी म्हटलं होतं.