मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा तिढा अजून कायमच आहे. यासंदर्भात आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीकडून लक्ष्मण माने उपस्थित होते. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोल्यात असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये बारामती, नांदेड आणि माढा या तीन जागांचाही समावेश आहे. त्यामुळे खरंच त्यांना महाआघाडीमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जागांचा वाद नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी आधी म्हटले होते. आता त्यांच्याकडून याचा घुमजाव करण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर बोलणी रखडलेली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. ते अकोल्यात बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार होती. मात्र, त्यांनी आपले प्रतिनिधी पाठविले होते. विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीकडून लक्ष्मण माने या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून आंबेडकर यांनी चव्हाणांना जोरदार टोला लगावला. यासंदर्भात आपण अशोक चव्हाणांना बोलण्याचे वकिलपत्र दिलेले नसल्याचे आंबेडकर म्हणालेत. देशात अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी अस्तित्वात येईल. मात्र, आपण राज्यातच बरे आहोत, असे सांगत आंबेडकरांनी या आघाडीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.