प्रथमेश तावडे, झी २४ तास, नालासोपारा : चकमकफेक पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागलेत. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली. एवढंच नाही तर परिसरात राहणाऱ्या कोकणी जनतेला गळाला लावण्यासाठी शर्मांनी विशेष प्रयत्न सुरू केलेत.
बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नालासोपारा विधानसभा क्षेत्राला खिंडार पाडण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी चकमकफेक पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. शर्मांचा पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा अजून मंजूर झाला नसला तरी शर्मांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सक्रीय झालेत.
नालासोपाऱ्यात पीएस फाऊंडेशनच्या वतीने छत्रीवाटपापासून सुरू झालेला प्रचार दहीहंडी उत्सव ते गणेशोत्सव उत्सवापर्यंत पोहोचलाय. शहरात प्रचंड शर्मांची बॅनरबाजी सुरू असून त्यावर शर्मांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे.
नालासोपारा मतदारसंघात राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी अवघ्या १०० ते २०० रूपयांत कोकण प्रवासाचे गाजर शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते दाखवत आहेत. त्यासाठी नालासोपारा आणि विरार शहरात ५० बसेसही तयार ठेवण्यात आल्या आहेत. नोंदणीला नागरिकांचा प्रतिसादही तुफान मिळतोय. गोविंदा पथकांसाठी शर्मांचा फोटो छापलेले टी शर्ट मोठ्या प्रमाणात वाटले जात आहेत.
प्रदीप शर्मांची चकमकफेक अधिकारी अशी ओळख आहे. १९८३ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले. शर्मांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक गुन्हेगारांचं एन्काऊंटर केले आहे. गुंड विनोद मटकरचं शर्मांनी केलेले एन्काऊंटर विशेष गाजले. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही शर्मांनी खात्मा केला.
लष्कर ए तैबाच्या तीन दहशतवाद्यांचाही शर्मांनी खात्मा केलाय. २००८ मध्ये शर्मा पोलीस दलातून निलंबीत झाले. लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी शर्मांना अटक करण्यात आली. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शर्मांची मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक आरोपांमधूनही शर्मांची मुक्तता करण्यात आली.
निवडणुकीच्या रिंगणात शर्मा उतरले तर वसईतली गुन्हेगारी आणि घराणेशाही संपुष्टात आणतील असा दावा शिवसेना करतंय. वसई नालासोपारा हा भाग एकेकाळी भाई ठाकूरच्या संघटीत गुन्हेगारीमुळे कुख्यात झालेला भाग. त्यात आमदार म्हणून शर्मांसारखा चकमकफेम अधिकारी हवा असा प्रचार सेनेतर्फे केला जात आहे.