मुंबई : राजकीय शहाणपणा दाखवून घेतलेले सगळेच निर्णय योग्य ठरतात असे नाही. राज्यातल्या अनेक दिग्गजांचे राजकीय निर्णय चुकल्यानं त्यांच्यावर हात चोळत बसण्याची वेळ आलीय. पुन्हा सत्ता येणार नाही असा हिशोब करुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
ज्या सत्तापदांच्या अपेक्षेनं त्यांनी आपापले पक्ष सोडले त्यांना सत्तापदांनी हुलकावणी दिलीय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जुन्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली पाहताना या नेत्यांना हात चोळत बसावं लागलंय. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडली.
भाजपची सत्ता येणार आणि सत्तेत वाटा मिळणार असा त्यांना हिशेब होता. पण त्यांचाही अंदाज चुकला. आज ते काँग्रेसमध्ये असते तर सर्वात मोठ्या खात्यावर त्यांचा दावा होता.
हेच झालं गणेश नाईकांच्या बाबतीत. गणेश नाईकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. पण तिकीट देण्यापासून भाजपनं त्यांची उपेक्षा केली. निवडून आल्यानंतर सत्तेचं गणित फिस्कटलं. त्यामुळं आमदारकीवर त्यांना समाधान मानावं लागतंय.
हीच गोष्ट झाली हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत ते काँग्रेसमध्ये राहिले असते तर त्यांना मानाचं पान निश्चित मिळालं असतं.
दुसरीकडं राणा जगजीतसिंह यांचीही तशीच अवस्था झालीय. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली नसती तर राणा जगजीतसिंह आज नव्या मंत्रिमंडळात असते. हे फक्त या नेत्यांच्याबाबतीत झालंय असं नाही.
हिच गोष्ट अब्दुल सत्तार यांच्याबाबतीतही झाली. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. त्यांना मंत्रिपद मिळालं पण तेही राज्यमंत्रिपदावरच त्यांना समाधान मानावं लागलं.
काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा राज्यमंत्रिपदावर दावा असता. भास्कर जाधवांच्या बाबतीत ही तेच झालं. त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला पण त्यांच्या वाट्याला कोणतंही मंत्रिपद आलं नाही.
राष्ट्रवादीत असते तर ते मंत्रिपदाचे दावेदार असते. राजकीय जीवनात नेत्यांचे असे अनेक निर्णय चुकतात. यावेळी फक्त ते अधिक ठळकपणे जाणवतंय.