सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी निर्मात्यांची चौकशी होणार?

सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Updated: Jun 17, 2020, 06:59 PM IST
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी निर्मात्यांची चौकशी होणार? title=

राकेश त्रिवेदी, मुंबई :   अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या का केली? याचा पोलीस तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूत याला कोणत्या कारणामुळे नैराश्य आलं होतं आणि त्याने करार केलेले चित्रपट नंतर काढून घेण्यात आले का याबाबत उलटसुटल चर्चा सुरु आहे. मुंबईतील मोठ्या निर्मात्यांनी सुशांत सिंह राजपूत यांच्यावर बहिष्कार घातला होता याचीही चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या दृष्टीकोनातून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूडमधील पाच प्रॉडक्शन हाऊस आणि निर्मात्यांना पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलावणार आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्याशी करार केलेले चित्रपट नंतर का काढून घेण्यात आले याची पोलीस माहिती घेणार आहेत.

सुशांत सिंह राजपूत याचा काही निर्मात्यांशी वाद झाला होता असंही कळतं. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करणार आहेत.

सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या जवळच्या मैत्रिणीमध्ये मोबाईल चॅट झालं होतं. पोलिसांनी या मैत्रिणीची चौकशी केली आहे. पण तिचा जबाब अजून नोंदवून घ्यायचा आहे.

आतापर्यंत पोलिसांनी सुशांतचा पासवर्ड प्रोटेक्टेड मोबाईल आणि लॅपटॉप अनलॉक केला आहे. त्यातील डिलिट केलेला डेटा पुन्हा मिळवला जाणार आहे.

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अकरा व्यक्तिंचे जबाब नोंदवले आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि मित्रांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून गेले चार दिवस बॉलीवूडमधलं राजकारण, गटबाजी आणि संघर्ष याबाबत उलटसुलट चर्चा आणि आरोप सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय पुढे येते हे महत्वाचे आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. एका दमदार अभिनेत्याची कारकीर्द अकाली संपुष्टात आल्याने त्याची चर्चा सगळीकडेच आहे. बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी गॉडफादरची गरज असते आणि बाहेरून आलेल्या कलाकाराला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं याची चर्चा सुशांतच्या आत्महत्येमुळे सुरू आहे. सुशांतसारखी आणखी कुणाची परिस्थिती होऊ नये यासाठी त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा छडा लागायला हवा अशी मागणी सोशल मीडियावरून होत आहे.