कुर्ल्यात अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ जणांना अटक

जमावानं पोलिसांवर हल्ला करून अनेक गाड्यांचीही नासधूस केली होती. 

Updated: Oct 23, 2019, 08:07 PM IST
कुर्ल्यात अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ जणांना अटक title=

मुंबई : कुर्ला येथे पंचराम रिठडीया यांच्या अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्यानंतर पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करत मानसिक तणावाखाली रिठडिया यांनी आत्महत्या केली होती. मंगळवारी त्यांच्या अंत्ययात्रेत जमावानं पोलिसांवर हल्ला करून अनेक गाड्यांचीही नासधूस केली होती. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दीडशे ते २०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

जमावाने केलेल्या मारहाणीत ५ पोलीस जखमी झाले होते. पंचाराम रिठाडिया यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र तक्रार देऊनही मुलगी सापडली नाहीच. उलट पोलीसच मुलीच्या वडिलांना धमक्या देत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर नैराश्यातून पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वेरुळांवर आत्महत्या केली. 

पंचाराम रिठाडिया अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येनं लोकं उपस्थित होते. जमावाने पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून मुलीचा शोध वेळीच घेतला असता तर ही वेळ आली नसती, अशी खंत रिठाडिया कुटुंबानं व्यक्त केली आहे.