मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला आणि केंद्र सरकारच्या वतीने आवश्यक असलेली सर्व मदत देण्याचं आश्वासनही दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि दमण दिव, दादरा आणि नगर हवेलीच्या प्रशासकांशीही चर्चा केली. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून बुधवारी ३ जून रोजी ते किनारपट्टीवर धडकणार आहे.
PM @narendramodi has spoken to CM of Maharashtra Shri Uddhav Thackeray, CM of Gujarat Shri @vijayrupanibjp and Administrator of Daman Diu, Dadra and Nagar Haveli Shri @prafulkpatel regarding the cyclone situation. He assured all possible support and assistance from the Centre.
— PMO India (@PMOIndia) June 2, 2020
महाराष्ट्रात हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यंत या वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर नौदलही सज्ज आहे. मुंबई महापालिका आणि पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. याशिवाय अन्य महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणाही या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री ८ वाजता निसर्ग वादळाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.