मुंबई : राज्य सरकार राज्यातल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या किंमतीत २ रुपये आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपये कपात होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे.
याच संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ विभागाच्या सर्व अधिका-यांची बैठक घेतली. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले आहेत. केंद्रानं अबकारी कर कमी केल्यानंतर राज्यांनाही व्हॅट कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारसुद्धा व्हॅट कमी करणार आहे
. दिवाळीपूर्वीच ग्राहकांना दिलासा देणार असल्याची माहितीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी झी 24 तासला दिली होती. त्यामुळे आता मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर हा निर्णय होणार असल्याचे बोललं जात आहे. हा निर्णय झाल्यास दिवाळीच्या तोंडावर महागाईने हैराण राज्यातल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.