मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआए (NIA) तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांना डिलिव्हर झालेलं नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंह परदेशात गेल्याची चर्चा सुरु आहे.
पण परमबीर सिंह देशातच असण्याची शक्यता असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंग यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी (Thane Police) लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे विमानतळावरुन परमबीर सिंग बाहेर जाऊ शकत नीत, त्यांना विमानतळावर अडवलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. परमबीर सिंग यांच्या रजेचा कालावधी संपला आहे, पण रजेचा कालावधी वाढवण्याबाबत मात्र त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंग नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रम कायम आहे.
गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी परमबीर सिंग यांचा शोध सुरु असल्याचं म्हटलं आहे. सरकारी अधिकारी असल्यामुळे परदेशात जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे, जर ते गेले असले तरी ती चांगली गोष्ट नाही. मंत्री असो कुणीही अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाण्यास परवानगी नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे. राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची कारवाई सुरू करणार असल्याची माहिती आहे. परमवीर सिंग प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत, पण त्यानंतरही परमबीर सिंग यांनी मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली आहे.