डिस्लेक्सियावर मात करून तरूणी कंपनीच्या संचालकपदी विराजमान

तरूणीची गरूडझेप  

Updated: Jan 31, 2020, 05:08 PM IST
डिस्लेक्सियावर मात करून तरूणी कंपनीच्या संचालकपदी विराजमान title=

मुंबई : आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांवर मात करून गुरूडझेप घेतलेली अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यातच आता इमान जवान या तरूणीच्या नावाची भर पडली आहे. लहानपणी डिस्लेक्सिया असलेल्या इमान यांना अभ्यासात अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणींवर मात करत त्या सनट्युयीटी आरईआय या सौरऊर्जा कंपनीच्या संचालकपदी विराजमान झाल्या आहेत. 

प्रचंड कष्ट, सातत्य आणि चिकाटी यां गुणांच्या जोरावर इमान यांनी ही गरूडझेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘डिस्लेक्सिया’असणाऱ्या विद्यार्थांना प्रामुख्याने वाचनात आणि लिखाणात अडचणी येतात. ‘डिस्लेक्सिया’ या आजारावर उपचार असून पालक आणि शिक्षकांकडून योग्य सहकार्य मिळाले तर ही सगळी मुले प्रचंड यश मिळवू शकतात.  

एखादा शब्द अडला की मुलांचे लक्ष लागत नाही, पण इतर विषयात ही मुले प्रचंड हुषार आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे टाळले आणि आईवडील आणि शिक्षकांनी अशा मुलांना समजून घेतलं तर या मुलांमध्ये सुधारणा दिसून येईल, असे जवान यांनी सांगितले.

सध्या इमान जवान या कंपनीच्या संचालकपदी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी परदेशातून उच्च शिक्षण घेतलं असलं, तरी केवळ भारतातच त्यांनी आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला. सौरऊर्जा या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवलं असून नुकताच जाहीर झालेल्या भारतातील यशस्वी महिलांच्या यादीत इमान यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.